Skip Navigation Links



लोंगोवाला बेस, पीटरसाहेब आणि बुकर

Author : Raj      Blog :Random Thoughts      Date: 9/27/2012 4:38:00 AM


टारगेट लोकेशन एकदम सेंट्रल आहे. मागच्या बाजूला तीन, पुढे दोन आणि बाजूला एक अशी पाच फायरिंग स्टेशन्स - फर्स्ट लाइन ऑफ अटॅक. त्याच्यानंतर वेगवेगळ्या अंतरावर सेकंडरी फायरिंग स्टेशन्स आहेत त्यांची इंटेन्सिटी कमी-जास्त होत असते. पण रोज सकाळ-संध्याकाळ किमान पाच-सहा तास फायरिंग चालू असतं. दहा दिवसात शत्रूचा पाडाव नक्की.

हे म्हणजे १९७१ च्या भारत-पाक युद्धातील लोंगोवाला बेस - जिथे आमचे सनी पाजी जिंकले - तिथलं वर्णन वगैरे वाटत असेल. तसं काही नाहिये. टारगेट लोकेशन म्हणजे आमचं घर, फायरिंग स्टेशन - गणेश मंडळं आणि फायरिंग म्हणजे भक्तिगीतं, आरत्या, भजनं ते चमेलीबाईंच्या सध्याच्या घडामोडी. हे सगळं एकाच वेळी चाललेलं असतं त्यामुळे एका दिशेने प्रथम तुला वंदितो, दुसरीकडून हिर्तिकचं सुपरहिट देवा श्रीगणेश, तिसरीकडून नुसताच ढोल-ताशा, चवथीकडून आली माझ्या घरी ही दिवाळी (!) आणि पाचवीकडून वाडकरांच्या आवाजात आले आले हो. (देहांतशासन द्या पण हे शेवटचं ऐकायला लावू नका, प्लीज!) आणि त्यापलीकडे कायकाय चाललेलं असतं देव जाणे (पन इंटेडेड).

हे दहा दिवस सहन केल्यानंतर जीवणाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. पहिलं म्हणजे शांततेची किंमत कळते. झेन भिक्षूंपासून आपल्या ऋषींपर्यंत सगळे एकजात निर्जन पर्वत, जंगलं यांची वाट का धरायचे याचा सुगावा लागतो. मग काही प्रश्न पडतात. लताबाईंना वर्षानुवर्षे आपल्या आवाजात आरती ऐकून कंटाळा येत असेल का? त्यांच्या घरी कोण आरती म्हणत असेल? हृदयनाथांना कुठून ही गाणी केली असं वाटत असेल का? गैरसमज नको, ही गाणी मलाही आवडतात. पण गाणं आवडणं वेगळं आणि इच्छा असो, नसो रोज पंचवीस-तीस वेळा रॉक कॉन्सर्टच्या डेसिबल लेव्हलला ते गाणं ऐकणं वेगळं.

'आयुष्यानं लिंबं दिली तर त्याचं सरबत करा' अशा अर्थाचं एक वाक्य टोपीकर नेहमी म्हणत असतो. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसात मिळालेल्या पोतंभर लिंबांचं हे सरबत आंबट मानून घ्यावं. ऐकलेल्या गाण्यांपैकी दोन गाणी आधी फारशी ऐकलेली नव्हती आणि लक्षात राहिली. एक होतं अवधूत गुप्तेंचं मोरयामधलं 'गणाधीशा' आणि दुसरं अजय-अतुलचं अग्नीपथमधलं 'देवा श्रीगणेश'. अवधूत गुप्तेंनी एक गंमत केली आहे. गाण्याची सुरूवात ऐकताना आपण चुकून ज्यूरासिक पार्कसारख्या एखाद्या चित्रपटाच्या शेवटी वाजणारं संगीत ऐकतो आहोत असं वाटतं.  एका भक्तिगीताची सुरूवात अशा संगीतानं? ये क्या हो रहा है दुर्योधन? नंतर लगेच गाणं नेहमीच्या ठेक्यात येतं. नंतर दोन कडव्यांमध्ये परत तेच. हे म्हणजे पं. जसराजांनी मैफल सुरू करण्याआधी संतानाच्या गिटारवर अर्धा मिनिट जॅमिंग करून नंतर 'मंगलम् भगवान विष्णू' सुरू केलं तर जसं वाटेल तसं वाटतं. रहमानसारखे प्रयोग जरूर करावेत पण कुठे करावेत याला काही नियम असतात. रहमान पारंपरिक गाण्यांमध्ये प्रयोग करताना अत्यंत जपून करतो, गाण्याचा बाज कुठेही बिघडू देत नाही. साधारणपणे 'मेजर नोट'मध्ये वाजवलेल्या अशा सुरावटींना विशिष्ट अर्थ असतो, त्या कुठे वापराव्यात याचे संकेत ठरलेले असतात. स्पिलबर्गच्या चित्रपटांमध्ये जॉन विलियम्ससारख्यांनी दिलेलं असं संगीत वाजत असताना क्षितिजावर सूर्य मावळत असतो आणि घोडेस्वार जात असतात. गणपतीच्या आरतीमध्ये याला स्थान नाही. नाहीतर मग नंतर मोदकांऐवजी डॉमिनोज पिझ्झा आणि पेप्सीचा नैवेद्य दाखवावा लागेल. तुलनेनं अजय-अतुलचं देवा श्रीगणेश 'टांगा पलटी, घोडे फरार' आहे. एकतर गाण्यात सुखविंदर आहे, इथेच अर्धी बाजी जिंकली. गाण्याचे शब्द रोचक आहेत (डर भी उससे डरा रे, अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे). ताल अस्सल मर्द मराठा आहे त्यात उगीच करायचं म्हणून केलेलं फ्युजन वगैरे नाही.

----

इतर बातम्यांमध्ये कालच सर पीटर स्टोथार्ड यांची मुलाखत वाचली. त्यांचे शब्द इतके प्रभावी होते की आमचे डोळे दिपले, मग गागल लावून बाकीची मुलाखत वाचली. आता इथे तुम्ही विचाराल, हे पीटर स्टोथार्ड कोण? हे 'टाइम्स लिटररी रिव्ह्यू'चे संपादक आहेत आणि बुकर पारितोषिक निवड समितीवर आहेत. यांची देदीप्यमान मुक्ताफळं पुढीलप्रमाणे, "पुस्तकांचं परीक्षण करणारे बरेच ब्लॉग आहेत हे चांगलंच आहे पण समीक्षकांची मतं आणि इतरांची (पक्षी : फाल्तू जन्तेची) मतं यांच्या दर्जामध्ये फरक असतो. इतके ब्लॉगर्स कोणती भलभलती पुस्तकं चांगली आहेत म्हणून सांगतात आणि लोकं वाचतात. यामुळे साहित्याची हानी होते आहे. सामान्य ब्लॉगर लोक समीक्षकांची गळचेपी करत आहेत." काढली का नाय इकेट? याला म्हणता स्नॉबरी. काही म्हणा, टोपीकर ज्या अत्युच्च दर्जाची स्नॉबरी करतो ती आपल्यासारख्या लोकांना जमणं कधीही शक्य नाही. ही पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेली स्नॉबरी आहे. पीटरबाबा काय म्हन्तोय धेनात आलं का? अभिजात साहित्य म्हणजे काय हे आम्ही तुम्हाला सांगूच, पण अभिजात समीक्षा कोणती हे ही आम्ही ठरवणार. आम्ही जे ठरवून देऊ तेच तुम्ही भक्तिभावानं वाचायचं. आणि तुम्हाला एखादं पुस्तक आवडलंच तर लगेच कळफलक बडवत जगाला सांगायला जाऊ नका, तुमची तेवढी लायकी नाही.

पीटर साहेबांनी या वर्षी बुकरसाठी निवड करताना सात महिन्यात १४५ पुस्तकं वाचली. मी एक नंबरचा पुस्तकी किडा आहे पण हे वाचून मी बी पार हेलपाटलो बगा. २१० दिवसात १४५ पुस्तकं म्हणजे दीड दिवसाला एक पुस्तक. अशा वेगानं पीटरसाहेब पुस्तक वाचणार, त्यातलं कोणतं चांगलं ते ठरवणार, त्याला बक्षीस देणार आणि ते आम्ही ब्रह्मवाक्य मानायचं? काहून? शेवटी समीक्षक - जरी खत्रूड असला तरीही - माणूसच असतो ना? शान मध्ये सुनील दत्तच्या मागे शंभर कुत्रे लागल्यावर तो ज्या वेगाने पळत सुटतो तितक्या वेगानं पुस्तकं वाचताना समीक्षेचा दर्जा खालावू शकत नाही का? पुस्तकाचा दर्जा ठरवताना त्याची वाक्यरचना, आशय, शब्द या सर्वांकडे लक्ष देणं अपेक्षित असावं. असं स्पीड रीडिंग करताना हे शक्य होतं? बरं, मग पीटरसाहेब बाकी काही करतात की नाही? उत्तर आहे, नाही. त्यांना कोणत्याही खेळात रस नाही आणि आयुष्यभरात त्यांनी फक्त सहा चित्रपट बघितले आहेत. संगीतात त्यांना रस आहे की नाही माहीत नाही. इथे आणखी एक मुद्दा येतो. ज्या माणसाला पुस्तकं सोडून बाकीचं जगच माहीत नाही, त्याला त्या पुस्तकांमध्ये जर ते बाकीचं जग असेल तर त्यात काय रस असणार? एखादं पुस्तक चित्रपट किंवा खेळाच्या पार्श्वभूमीवर असेल तर ते चांगलं की वाईट हे ते कसं ठरवणार?

पूर्वीच्या काळी पुस्तकं, शिक्षण, ज्ञानसंवर्धन फक्त एका वर्गाची मक्तेदारी असायची. पीटरजींना तेच अपेक्षित आहे असं दिसतं. नाही म्हणायला मागच्या वर्षी बुकर निवड समितीच्या अध्यक्षा स्टेला रिमिंग्टन यांनी "जी पुस्तकं लोक वाचतील आणि त्यांचा आनंद घेतील अशा पुस्तकांना पारितोषिक देण्यात यावं" असं म्हणून सगळ्यांचीच विकेट काढली होती. त्याला उत्तर म्हणून पीटर म्हणतात की 'रीडेबिलिटी' तितकीशी महत्त्वाची नाही. आरं बाबा, रीडेबिलीटी महत्त्वाची नाही ना, मग लिहू दे की ब्लॉगर लोकांना लिहायचं ते? तुझ्या पोटात का दुखतंय? पोटात अशासाठी दुखतंय की यांची जड शब्दातली बद्धकोष्ठी समीक्षा कुणी वाचायला तयार नाही. बहुतेक ब्लॉगर सामान्य वाचक असतात, त्यांना जे आवडतं किंवा आवडत नाही ते प्रामाणिकपणे लिहितात, वाचणारे वाचतात. पीटरच्या लेखी रोलिंगसारखे लेखक म्हणजे कस्पटासमान. आणि हॅरी पॉटर इतकं लोकप्रिय झालं त्याचा अर्थ ते नक्कीच फालतू असणार, तरी चालले सगळे रोलिंगबाईंच्या मागे. म्हणूनच रोलिंगबाईंना बुकर मिळणं शक्य नाही. सात पुस्तकांमध्ये एक प्रतिसृष्टी निर्माण करून जगभरातल्या लोकांना गुंतवून ठेवणं - त्यात काय मोठं? लोकप्रिय आहे ना मग ते चीपच असणार. त्यापेक्षा कुणालाही कळणार नाही असं एखादं पुस्तक लिहून दाखवा. साहित्याच्या कक्षा रूंदावून दाखवा. टोलकिनला नोबेल नाकारणारे याच जातीचे. विक्रम सेठला आजपर्यंत बुकर नामांकन मिळालेलं नाही ही गोष्ट बुकर समितीसाठी लाजिरवाणी आहे.

पीटरसाहेबांच्या मते फक्त मनोरंजन करणारी पुस्तकं महत्त्वाची नाहीत. अभिजात साहित्य म्हणजे काय हे दाखवणं समीक्षकाचं काम आहे. हे जरी मान्य केलं तरी हे तथाकथित अभिजात साहित्य खरंच अभिजात आहे हे कशावरून? आणि यांनी सांगितलं म्हणून लोक ते वाचतील का? वाचणार नसतील तर काय उपयोग? दुसरं - साहित्य खरंच अभिजात असेल तर त्याला समीक्षकांच्या सर्टिफिकेटची गरज आहे का? शेक्सपिअरची नाटकं, डिकन्सचे चित्रपट अजूनही का चालतात? शेरलॉक होम्स अजूनही का तग धरून आहे? त्यांना कुठल्या समीक्षकानं पास केलं होतं? अर्थात विल सेल्फप्रमाणे हे सगळे रद्दी असंच म्हणायचं असेल तर मुद्दाच खुंटला. (विल सेल्फ या वेळच्या बुकर स्पर्धेत आहे.)

असो, तर पीटरसाहेब सध्या बुकरसाठी अभिजात लेखक निवडण्यात मग्न आहेत. त्यांनी बुकर निवडून 'हे वाच' असं सांगेपर्यंत मी दुसरं काही वाचायचं नाही असं ठरवलं आहे. तुम्हीही पुस्तकांवर लिहू-बिहू नका. इथं साहित्याची हानी होते आहे त्याची कुणाला काळजीच नाही. वाचलं पुस्तक आणि चालले सांगायला जगाला आवडलं म्हणून. पुढच्या आठवड्यात नोबेलही आहे. मुराकामीचा नंबर या वेळी तरी लागतो का बघायचं आहे.

पण मला एक वेगळीच चिंता आहे. पीटरसाहेबांना मराठी येत नाही त्यामुळे ते मराठी वाचणार नाहीत. मग मराठीत अभिजात काय आहे हे आपल्याला कसं कळणार?

एक्सपेलीयार्मस!

----

१. कल्पना करा, १०० वर्षांपूर्वी ब्लॉग असते आणि ही सुपीक कल्पना पीटरबाबाच्या डोक्यात आली असती तर काय झालं असतं? लगेच ऍक्ट पास करून सोम्या-गोम्यांचं ब्लॉगिंग बंद केलं असतं. तरीही लिहिलाच एखादं रसग्रहण, तर डायरेक्ट येरवडा. "टुम जैसा जाहिल, गवार लोग ब्लॉग लिखनेको नही मांगता." इति नंतरच्या मनोजकुमारच्या पिक्चरमधला टॉम अल्टर.

२. इथे वुडी ऍलन आठवला, "I took a speed reading course and read War and Peace in twenty minutes. It's about Russia."

Bloggers

active bloggers in the last 24 hrs. Number shown in the bracket represents number of posts published in past 24 hrs,


other authors(56)

Firoze Shakir Photographerno1(7)

Ambica Srimal(3)

AMJAD KHAN(3)

N.GURURAJ.(3)

sankarshan(3)

Deeps(2)

Nish(2)

Praveen Battula(2)

R.D. Bhalekar(2)

RWABhagidari.blogspot.com(2)

Sameena Prathap(2)

SEO(2)

Srinivasan Sampathkumar(2)

Vikram Karve(2)

- Sugar Cube -(1)

Aarthi(1)

Abrachan Pudussery(1)

Amarendra(1)

anouradha bakshi(1)

Anukampa(1)

Anuradha Goyal(1)

Aparna(1)

Archana Kumar(1)

Aruna Manikandan(1)

aseemrastogi2(1)

Ashwini Kumar(1)

Bharathi(1)

Bombay Chowparty(1)

Champa(1)

churumuri(1)

churumuri(1)

Cynical(1)

Cynthia Z(1)

Daksha(1)

Devi(1)

Dew(1)

Disha(1)

DivSu(1)

Divya Kudua(1)

Fidarose Isha(1)

Geek Girl(1)

Hamaree Rasoi(1)

Harimohan(1)

Ibrahim(1)

IS(1)

Jean(1)

Kalyani(1)

Kaveri Venkatesh(1)

Kumar Harsheet Raj(1)

Kunal(1)

Love Baronia(1)

mahima(1)

Manreet Sodhi Someshwar(1)

Megha(1)

Megha Sarin(1)

mervin anto(1)

MISTAKE(1)

Mohammad Khalid Siddiqui(1)

monikamanchanda(1)

Nagendra Bharathi(1)

Neha(1)

nikschumi(1)

Nisa Homey(1)

Nisha(1)

Nithya(1)

Nona(1)

nourishncherish(1)

P.(1)

Patricia Torres(1)

pinksocks(1)

Piyush Kaushal(1)

Pooja(1)

Preety(1)

Raafay Awan(1)

Ragesh Chakkadath(1)

Ram Bansal(1)

Ram N(1)

rhythmnguitars(1)

Richa Singh(1)

RNA Corp(1)

Robinsh Kumar(1)

Rohit Rajpal(1)

saketvaani(1)

Sameena Prathap(1)

Sangeetha M(1)

Sankara Subramanian(1)

sareez(1)

Sayantani(1)

Sharjeel(1)

Shobha(1)

Shweta Ganesh Kumar(1)

Slogan Murugan(1)

Smita Srivastava(1)

Sophie(1)

Sravs(1)

Sree(1)

Sreedhar Jeshurun(1)

Srikanth(1)

Suchismita(1)

Sujoy Das(1)

sumana Mukhopadhyay(1)

Surya.(1)

The Guy in the Hat ™(1)

tikulicious(1)

unmanagedexe(1)

Vasudev Ram(1)

Vijay Rajput(1)

Vishesh Shrivastava(1)

VJ Sharma(1)

vskesavarao(1)


garland of Languages of India
an amalgamation of the diversified traditions
gracefully presented with novelty
http://www.haaram.com