सहसा एखादा चित्रपट आवडतो किंवा आवडत नाही. आणि आवडला की नाही याचा निर्णय घ्यायला फारसं अवघड जात नाही. गॅंग्ज ऑफ वासेपुरचे दोन्ही भाग बघताना चित्रपटाविषयीचं मत बदलत गेलं. सुरूवात झाल्यावर पात्रांची संगती लागत नव्हती. चित्रपट नेहमीच्या अंगाने न जाता वेगाने वाटचाल करत होता. मनोज बाजपेयी आल्यावर कथा थोडीशी स्थिरावल्यासारखी वाटली. एक नक्की होतं. चित्रपटाची प्रेरणा गॉडफादरवरून घेतली आहे हे स्पष्ट दिसत होतं. अर्थात गॉडफादरच्या यशामध्ये लेखक मारिओ पुझोचाही महत्त्वाचा वाटा आहे. त्यानं कादंबरीत दिलेली वर्णनं इतकी अचूक होती की त्यात फारसा बदल करावाच लागला नाही अशी कबुली खुद्द कपोलानंच दिली आहे. मधूनमधून सत्याही आठवत होता. बहुधा जगात कुणीही गुन्हेगारीवर चित्रपट बनवला तर त्याला कपोलाचं गारूड झुगारून देणं शक्य होत नसावं. रामूनं अधिकृतरीत्या गॉडफादरवरून सरकार बनवलाच, पण त्याआधीच्या सत्याची प्रेरणाही तीच होती. सोनी आणि भिकू तापट स्वभावाचे, मायकेल आणि सत्या थंड, डोकं शांत ठेवून निर्णय घेणारे, मायकेल पहिला खून हॉटेलमध्ये करतो आणि सत्याही, याला क्लेमेंझा पिस्तूल देतो, त्याला भिकू. तिथे जॉनीला रोल मिळावा म्हणून निर्मात्याला बिछान्यात धमकी मिळते, इथेही तसंच फक्त रोलऐवजी उर्मिलाला गाणं मिळतं. दोन्हीकडे पोलीस अधिकाऱ्याला मारल्यानंतर जे पडसाद उमटतात त्याच्या चित्रीकरणात देखील साम्य आहे. इतकं असूनही सत्या आवडला कारण रामूचं हे रूपांतर अस्सल देशी वाटलं. वासेपुर बघताना आधी कदाचित याच धर्तीवर आणखी एक चित्रपट बघायला मिळतो की काय असं वाटून गेलं. पहिल्या भागाच्या शेवटी सरदार खानाला ज्या तर्हेने मारतात तो प्रसंग सोनी कॉर्लिऑनला मारतात तस्साच घ्यायला हवा होता का असा वैतागही आला. याचा अर्थ पहिला भाग आवडला नाही असं अजिबात नाही. मनोज बाजपेयी आणि सहकलाकारांची कामं उत्कृष्ट होती. एकुणात आपल्या मातीत बनवलेला 'गॉदफादर' असं एक ढोबळ मत पहिल्या भागाबद्दल झालं.

दुसरा भाग बघायला सुरूवात केली तेव्हा सरदार खानच्या मुलांची कथा येणार, आणखी मारामारी - त्यात नवीन काय असणार असा एक अंदाज होता. इथं अनुरागनं पहिला धक्का दिला. पहिल्या भागाचा मूड संपूर्णपणे गंभीर होता. एखादं वाक्य विनोदी वाटेल न वाटेल इतपतच. मूळ गॉडफादरमध्ये तर कपोलानं विनोदाला जागाच ठेवली नाहीये. अगदी सुरुवातीचं लुका ब्रासीचं दोन वाक्य पाठ करणंही विनोदी म्हणता येणार नाही. रामूनं सत्यामध्ये विनोद वापरला पण तो रमेश सिप्पींनी जसा शोलेमध्ये वापरला तसा. विनोद आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या हशानं परमावधी गाठली की प्रेक्षकांना धक्का द्यायचा - गोळीबार आणि मृत्यू. याखेरीज रिलीफ म्हणून एक-दोन हलकेफुलके प्रसंग आहेत तेवढेच. वासेपुर भाग २ मध्ये काहीतरी वेगळंच चाललं होतं. सुरूवातीला सरदार खानची प्रेतयात्रा निघते तिथे चक्क ऑर्केस्ट्रावर 'याद तेरी आयेगी, मुझको बडा सतायेगी' चाललेलं. पुढे दानिश मरतो तेव्हा त्याच्या प्रेतयात्रेलाही तोच गायक, तोच ऑर्केस्ट्रा, फक्त गाणं बदललेलं - 'तेरी मेहेरबानियां'. यामुळे या गंभीर प्रसंगांचा बाज एकदम बदलून जातो. नंतरही विनोदी संवाद भरपूर आहेत पण ते सर्व विनोद प्रेक्षकांना विनोदी वाटतील असे आहेत. पात्रांना त्यांचे संवाद कुणाला विनोदी वाटू शकतील याची कल्पनाही नाही. ते आपलं नेहमीचं आयुष्य जगत आहेत. यामुळं प्रेक्षकांचा गोंधळ होतो. जे प्रसंग गंभीर असायला हवेत तिथे प्रेक्षक हसत असतात. दुसऱ्या भागात डेफिनेट आणि त्याचे इतर दोन साथीदार सुलतानच्या मागावर असतात तो प्रसंग कोणत्याही विनोदी चित्रपटात फिट्ट बसेल असा आहे.
याखेरीज पहिल्या भागाच्या शेवटी शेवटी एक महत्त्वाचा घटक कथेत येतो आणि शेवटपर्यंत राहतो - बॉलीवूड. फैजल त्रिशूल बघताना रडतो तिथे याची सुरूवात होते. दुसऱ्या भागात पात्रांवर बॉलीवूडचा प्रभाव वाढत जातो. पर्पेंडीक्युलरचं संजय दत्तचे चित्रपट बघणं, डेफिनेटच्या तोंडी मोहसिन खानचा संवाद, फैजलचं आरशासमोर अमिताभ स्टाइलने पिस्तूल चालवणं, फैजल खानचं रजनीकांतसारखी सिगरेट पेटवणं, तो घरी आल्यावर मोहसिनाचं फिल्मी स्टाइलने गिरकी घेणं, फैजल तुरूंगातून सुरून आल्यावर मिरवणुकीत वाजणारं 'वन टू का फोर'. हे सगळं बघितल्यावर ही पात्रं पडद्यावरच्या स्वप्नांना आपल्या आयुष्यात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत हे जाणवतं. याचं स्पष्टीकरण रामाधीर नंतर देतो, 'यहां हर एक के दिमाग में एक पिक्चर चल रही है.'
चित्रपटांचा माणसांवर असा परिणाम होणं नवीन नाही. आणि हे सगळ्या थरांमध्ये बघायला मिळतं, फक्त त्याचं प्रमाण आणि प्रकटीकरण प्रत्येकासाठी वेगळं असतं इतकंच. एक दूजे के लिए आल्यानंतर आत्महत्यांच्या बातम्यांमध्ये वाढ झाली होती, मुन्नाभाई आल्यानंतर राजकीय नेत्यांनाही गांधीजी परत आठवले होते. अनुरागनं चित्रपट आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम यांना 'सटायर'च्या पातळीवर नेलं आहे. आणि या दृष्टिकोनातून पाहिलं तर चित्रपटात आलेल्या आतापर्यंतच्या घटना वेगळ्या रूपात दिसायला लागतात. जणू अनुराग म्हणतो आहे, "ही सगळी पात्रं जसं एक बॉलीवूडवर आधारलेलं आयुष्य जगत आहेत तसंच त्यांना चित्रित करण्यासाठी मी ही त्याच कचकड्याच्या जगातले संदर्भ वापरतो आहे." यामुळे प्रसंगांना वेगळा अर्थ मिळतो. पहिल्या भागाचा पहिलाच शॉट 'सांस भी कभी बहू थी' नं सुरू होतो किंवा मोहसिनाच्या हातात 'जाल' नावाची रेल्वे स्टेशनवर मिळते तशी हिंदी कादंबरी दिसते हे संदर्भ जुळत जातात. दुसऱ्या भागात नवीन पोलिस अधिकारी येणं कथेच्या दृष्टीनं फारसं महत्त्वाचं नाही (नंतर त्याला काहीच वाव दिलेला नाही), पण तिथे सत्या प्रकर्षाने आठवतो. सत्याचा सहलेखक अनुरागच होता हे माहीत असलं तर 'सटायर' आणखी गडद होत जातं. दानिशच्या लग्नातलं 'सलाम-ए-इष्क' सत्यामधल्या 'सपने में मिलती है' चं विडंबन असावं अशी शंका येते. अशा प्रकारे एकीकडे सिनेमाचं कथानक चालू असताना 'चौथी भिंत' तोडून बाहेरचे संदर्भ देणारी उदाहरणं भारतीय चित्रपटांमध्ये फारशी बघायला मिळत नाहीत. डेव्हिड धवनच्या एका चित्रपटात गोविंदा 'ये कहानी इंटरव्हल के बाद एक नया मोड लेगी' असं म्हणतो किंवा गोलमालमध्ये अमिताभ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत जो शॉट देतो तो हृषिदांच्याच त्याच वर्षी येणाऱ्या जुर्मानामधला असतो.
हिंदी चित्रपट आणि जागतिक चित्रपट यातील एक मुख्य फरक म्हणजे आपल्याकडची गाणी. गाणी ज्या प्रकारे हिंदी सिनेमाचा अविभाज्य भाग बनली आहेत ते पाहून इटालियन ऑपेराची आठवण होते. भारतीय आणि इटालियन दोघांनाही भावनाप्रधान व्हायला आवडतं, त्याचा सहज आविष्कार गाण्यांमधून केला जातो. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये कधी कधी गाणी येतात पण ती अंग चोरून येतात. गाण्याची एखादी लकेर ऐकू आली नाही आली की झालं. अर्थात चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये संपूर्ण गाणं ऐकायला मिळतं. गाण्यांऐवजी हॉलिवूडमध्ये वाद्यसंगीताला प्राधान्य दिलं जातं. जॉन विलियम्ससारखे संगीतकार स्टार वॉर्स किंवा ज्यूरासिक पार्कसारख्या चित्रपटांसाठी खास 'स्कोअर' लिहितात. आपल्याकडे गाण्यांविना चित्रपट करण्याचेही प्रयत्न झाले. बी. आर. चोप्रांचा कानून किंवा काही वर्षांपूर्वी आलेला वेंस्डे, पण हे अपवादच. याउलट श्याम बेनेगल यांनी आधुनिक महाभारताची कथा सांगताना कलयुग मध्ये 'व्हॉट्स युअर प्रॉब्लेम' कल्पकतेनं वापरलं.
सत्यामध्ये गाणी 'गोली मार भेजे में' आणि 'सपने में मिलती है' प्रसंगानुरूप होती, इतर दोन नसती तरी चाललं असतं. वासेपुरमध्ये प्रेतयात्रेसारख्या प्रसंगामध्ये नेहमीची हिंदी गाणी वापरल्यानं या चित्रपटाची गाणीही नेहमीसारखी असून चालणार नव्हतं. अनुराग आणि संगीतकार स्नेहा खानवलकर यांनी इथे अनोखा प्रयोग केला. बहुतेक गाण्यांना पारंपरिक रचनेचा बाज आहे, काही वेळा वाद्यसंगीत नेहमीचं नाही, रहमाननं 'ससुराल गेंदा फूल' मध्ये केलं तसं काहीसं. आवाजही नेहमीच्याच यशस्वी गायकांचे नाहीत. (छी-छा-लेदर गाणारी
दुर्गा सायन स्टेशनच्या लोकलमध्ये गात असे.) ही गाणी ज्या प्रकारे
वापरली गेली आहेत त्याला तोड नाही. फैजल मोहसिनाकडे आलेला असताना 'काला रे', लग्नाच्या वेळी 'तार बिजली से पकडे' ही त्यातल्या त्यात ठराविक उदाहरणं. पण शमशाद आलम डेफिनेटचा पाठलाग करत असताना 'मेरा जूता फेक लेदर' अजिबात अपेक्षित नसतं. 'काला रे' मध्ये 'तन काला रे, मन काला रे' पासून 'काला बटुआ, पैसा काला' आणि 'बैरी कोल कोल' आणि 'सैंया करते जी कोल-बजारी' पर्यंत काळ्या रंगाच्या रूपकाचा अप्रतिम उपयोग केला आहे
१. सर्वात महत्त्वाचं गाणं - पियुष मिश्राचं 'इक बगल में चांद होगा' - एक सुरेख कविताच आहे. हे गाणं दोन महत्त्वाच्या ठिकाणी येतं पहिल्यांदा - जेव्हा शाहिद खान गाव सोडून जातो आणि या सर्व संघर्षाला सुरूवात होते. आणि दुसऱ्या वेळेस फैजल मेल्यावर मोहसिना फरहानबरोबर मुलाला घेऊन मुंबईला आलेली असताना परत तेच गाणं - एक वर्तुळ पूर्ण होतं. या गाण्यांसाठी स्नेहानं बिहारची लोकगीतं ते त्रिनिदादचं संगीत असे वेगवेगळे प्रकार वापरले. यासाठी ठिकठिकाणी प्रवास केला. आज हिंदी चित्रपटसृष्टीतील महिला संगीतकारांची मोजदाद करायची झाली तर एक बोटही जास्त होतं. हॅट्स ऑफ टू स्नेहा खानवलकर. चित्रपटात इतर प्रशंसनीय गोष्टी अनेक आहेत. नवाजुद्दीनसारख्या गुणी अभिनेत्याला अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर अखेर साजेशी भूमिका मिळाली. चित्रपटातील हिंसाचार अतिशयोक्तिपूर्ण आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे. मात्र अनुरागच्या मुलाखतीमधून कळलं की ९० % कथानक सत्य घटनांवर आधारित आहे. नवाजुद्दीन त्याच्या गावी गेला असताना तिथे सहा दिवसात सात खून झाले. ही गावं नकाश्यावर कुठं आहेत त्याचाच पत्ता नसल्यानं बहुतेक वेळा या बातम्या मिडियापर्यंत पोचतच नाहीत.
कोणत्याही चित्रपटाबद्दल वेगवेगळी - बहुतेक वेळा परस्परविरोधी - मतं असतात. वासेपुरचे दोन्ही भाग बघताना मला माझीच आधीची मतं बदलावीशी वाटली.
----
चित्र विकीवरून साभार.
१. सध्या मात्र हे गाणं ऐकताना कॅग आणि यूपीए आठवतात. कॅग - सैंया करते जी कोल बजारी, यूपीए - बैरी कोल, कोल, कोल!