विक्रम सेठची ओळख त्याच्या कवितांमधून झाली. 'द हम्बल ऍडमिनिस्ट्रेटर्स गार्डन' आणि 'ऑल यू हू स्लीप टुनाइट' हे दोन कवितासंग्रह वाचनात आले. माझ्या तुटपुंज्या वाचनप्रवासात असं काही कधी वाचायला मिळालं नव्हतं. म्हटलं तर अगदी साध्या वाटणाऱ्या कविता, कधीकधी इतक्या सोप्या की वाचल्यावर वाटावं हे आपल्यालाही सहज जमायला हरकत नाही. काही कविता चित्रांसारख्या, मोजक्या शब्दांमधून वातावरणाचा एखादा क्षण अलगद पकडणाऱ्या. मग 'बीस्टली टेल्स - फ्रॉम हिअर ऍंड देअर' वाचलं - नुसती धमाल. दहा कविता पण त्या कशा तर भारत, चीन, ग्रीस, युक्रेन इथल्या रूपककथांवर आधारित. प्रत्येक कथेत दोन-दोन प्राणी - मांजर आणि कोंबडी किंवा मगर आणि माकड. वेगवेगळ्या शब्दांची, जोडशब्दांची, नादांची आणि यमकांची नुसती लयलूट चाललेली, आपण फक्त आनंद लुटायचा. मग हाती आलं - गोल्डन गेट. हे काय प्रकरण आहे हे कळल्यावर छाती दडपली. दोन-एकशे पानांची कादंबरी पण पूर्णपणे सुनीतांमध्ये. यातल्या सुनीतांचं स्वरूप रशियन लेखक पुश्किनच्या 'युजीन ओंजिन'वर आधारित आहे. कॅलिफोर्नियातल्या आयुष्यांवर आधारित या कादंबरीचं वर्णन गोर विदालनं 'द ग्रेट कॅलिफोर्निया नॉव्हेल' या शब्दात केलं आहे. 'थ्री चायनीज पोएट्स' या चिनी कवितांच्या अनुवादासाठी विक्रम सेठ एका वर्षात चिनी भाषा शिकला हे कळल्यावर या माणसाबद्दल आदरयुक्त भीती आणि भीतियुक्त आदर वाटायला लागला.
पण अजूनही गद्य काही वाचलं नव्हतं. 'ऍन इक्वल म्युझिक' खूप अपेक्षेनं वाचायला घेतलं पण फारसं आवडलं नाही. अर्थात आता ते नेमकं का आवडलं नव्हतं ते ही आठवत नाही त्यामुळे परत चाळून बघायला हवं असं वाटतं आहे. पण अजूनही एका पुस्तकाशी लपंडाव चालला होता - 'अ सूटेबल बॉय. ' काही साहित्यिक त्यांच्या विशिष्ट पुस्तकांबरोबर जोडले गेलेले असतात. त्यांचं नाव घेतलं की ते पुस्तक आठवतच. मेलव्हिल - मोबी डिक, डिकन्स - डेव्हिड कॉपरफिल्ड वगैरे. तसं विक्रम सेठ म्हटलं की सुटेबल बॉय आलंच. एकदा लायब्रीत त्याचा एक भाग मिळाला तो वाचला पण दुसरा उपलब्ध नव्हता. या ना त्या कारणानं वाचायचं राहून जात होतं. अखेर आख्खं पुस्तक हाती आलं एकदाचं. मग मारली बैठक आणि घेतलं वाचायला.
साल १९५१. सूटेबल बॉयच्या पहिल्याच पानावर मिसेस रूपा मेहता यांची मुलगी सविता हिच्या लग्नाचा सोहळा चालू आहे. या दरम्यान त्या धाकटी मुलगी लता हिला म्हणतात, "मी ठरवेन त्या मुलाशीच तुझं लग्न होणार. " खरं तर कथेचा गाभा पुस्तकाचं नाव आणि या पहिल्याच वाक्यानं स्पष्ट व्हायला हवा. पण सूटेबल बॉयची कथा म्हणजे लतासाठी योग्य मुलगा शोधणं असं म्हणणं म्हणजे "ताजमहाल म्हणजे फार कै नै, मुमताज बेगमची कबर आहे" असं म्हणण्यासारखं आहे.

गोष्ट आहे चार कुटुंबांची - मेहरा, कपूर, खान आणि चॅटर्जी. मिसेस रूपा मेहरा, त्यांची चार मुलं - अरूण, सविता, लता, वरूण; महेश कपूर आणि मिसेस कपूर यांची तीन मुलं - प्राण, वीणा आणि मान; बैतारचे खानसाहेब यांची तीन मुलं - झैनाब, इम्तियाझ आणि फिरोझ; आणि सगळ्यात शेवटी जस्टीस चॅटर्जी आणि मिसेस चॅटर्जी यांची पाच मुलं - मीनाक्षी, अमित, दिपांकर, काकोली, तपन. अरूण मेहराचं लग्न मीनाक्षी चॅटर्जीशी झालंय तर प्राण कपूरचं सविता मेहराशी. मान कपूर, फिरोझ खान यांची आणि त्यांचे वडील महेश कपूर आणि नवाबसाहेब यांची घट्ट मैत्री आहे. दमलात? ही तर फक्त मुख्य पात्रं झाली. याशिवाय मिसेस मेहरा यांचे वडील डॉ. किशनचंद सेठ आणि त्यांची दुसरी बायको पार्वती, वीणाचा नवरा केदारनाथ टंडन, मुलगा भास्कर आणि मैत्रीण प्रिया, रूपा मेहरा यांची मैत्रीण-कम-मानलेली मुलगी कल्पना, महसूलमंत्री महेश कपूर यांचे सहकारी - मुख्यमंत्री शर्मा आणि प्रतिस्पर्धी - गृहमंत्री अगरवाल, गावातील प्रख्यात कोठेवाली सईदा बेगम, तिची बहीण तस्नीम आणि नोकराणी बिब्बो, प्रसिद्ध गायक उस्ताद माजिद खान, सारंगीवादक इश्फाक, उर्दू शिक्षक राशीद, लताची घनिष्ठ मैत्रीण मालती, इंग्लिश विभागात लेक्चरर असलेल्या प्राण कपूरचे वरिष्ठ प्राध्यापक शर्मा, गणित विभागातला मित्र सुनील पटवर्धन, त्याचे वरिष्ठ प्राध्यापक दुर्राणी, त्यांचा मुलगा कबीर अशी अनेक पात्रं. आणि तीन-चार पानांसाठी 'पेशल अपीअरन्स' - पं. जवाहरलाल नेहरू.
टॉलस्टॉयबद्दल अशी तक्रार बरेचदा ऐकली आहे की त्याची पात्रं लक्षात राहत नाहीत. सुटेबल बॉयच्या बाबतीत असं अजिबात झालं नाही. प्रत्येक पात्र त्याच्या सगळ्या वैशिष्ट्यांसकट डोळ्यापुढे उभं राहतं. विशेष म्हणजे विक्रम फारच क्वचित पात्रांचं वर्णन करतो. काही लेखकांना पात्र कथेत आलं रे आलं की हरवलेल्या व्यक्तींची वर्णनं देतात त्याप्रमाणे त्यांची उंची, चेहरा, वर्ण अशी सगळी माहिती द्यायची सवय असते. सूटेबल बॉयमध्ये कथेच्या दृष्टीनं अगदी महत्त्वाचं असेल तरच पात्रांच्या एखाद्या वैशिष्ट्याचा उल्लेख केला आहे अन्यथा ते पात्र कसं दिसतं हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य वाचकाला आहे. हे सुरूवातीला लक्षात आलं नव्हतं पण कथानकानं पकड घेतल्यानंतर ही पात्रं आपोआप डोळ्यापुढं आली - काही प्रत्यक्षातली, काही सिनेमातली. महेश कपूर म्हटलं की मला काळा कोट घातलेले बलराम जाखड आठवतात. मिसेस रूपा मेहता - गोलमालमधली दीना पाठक, अमित चॅटर्जी - 'प्रोतिद्वंदी'मधला ध्रितिमान मात्र तितका गंभीर नाही, प्राण कपूर - रजनीगंधामधला दाढीवाला, केदारनाथ टंडन - जन अरण्यमधला सोमनाथ. कोणतंही वर्णन न वाचता हा चिमित्कार कसा झाला ते विक्रमलाच ठाऊक. आणखी एक म्हणजे कसं कोण जाणे पण वाचताना आपल्या मनात काय चाललं आहे हे निवेदकाला आणि पर्यायाने विक्रम सेठला कळत असावं. पहिल्याच पानावर मिसेस मेहरांचं वाक्य वाचून जेन ऑस्टीनच्या 'प्राइड ऍंड प्रेज्युडीस'ची आठवण न झाली तरच नवल. नंतर जेन ऑस्टीनचा उल्लेख येतो आणि लता 'एम्मा' वाचताना दिसते. प्रियाच्या नोकराचं वर्णन एका ओळीपुरतंच येतं पण तरीही तो लक्षात राहतो कारण त्याला सगळ्यांची औषधं चोरून खायची सवय असते. ते वाचल्यावर वाटतं, हे तर डिकन्ससारखं चाललं आहे - छोट्याहून छोट्या पात्रालाही काहीतरी विशिष्ट लकब किंवा सवय देऊन ते लक्षात राहील असं करायचं. असा विचार येतो न येतो तो लगेच पुढच्या पानावर उरिया हीपचा संदर्भ येतो. जणू विक्रम सेठ म्हणतो आहे, "मलाही माहिती आहेत यांची प्रेरणास्थानं, काळजी नसावी. " हे ऐकून मी खजील होतो आणि चिकित्सा बाजूला ठेवून निमूट वाचायला लागतो.
कथानकाचा काळ फार काळजीपूर्वक निवडलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून चार वर्षं झाली आहेत. स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक याच सालात झाली. याखेरीज तेव्हाच्या संसदेपुढे असलेल्या काही प्रश्नांचा संदर्भ कथानकात येतो. स्त्रियांना समान कायदे देणारे 'हिंदू कोड बिल', जमिनदारी संपुष्टात आणणारे 'जमिनदारी अबोलिशन बिल'. पैकी 'जमिनदारी अबोलिशन बिल' अस्तित्वात आणि अमलात आणण्याचे अधिकार केंद्राने प्रत्येक राज्याला दिले होते. सुटेबल बॉयची कथा पूर्व प्रदेश या काल्पनिक राज्यातील ब्रह्मपूर या शहरात घडते. जमिनदारी संपवण्याच्या बिलाचे कर्ते महसूल मंत्री महेश कपूर असतात. मात्र हे बिल अमलात आल्यावर त्यांचे मित्र बैतारचे नवाबसाहेब यांची मालमत्ताही जप्त होणार. यामुळे त्यांच्या संबंधात येणारे चढउतार कथानकाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे बिल घटनेच्या विरोधात आहे या मुद्द्यावरून कोर्टातही जाते. ब्रह्मपूरमध्ये चौकात असलेल्या मशीदीच्या शेजारीच शिवमंदिर बांधण्याचे प्रयत्न चालू असतात आणि या अनुषंगाने ब्रह्मपुरमधील हिंदू आणि मुसलमान समाजात संघर्षांचे बरेच प्रसंग येतात. सुटेबल बॉय १९९३ मध्ये प्रकाशित झाले. १९९२ मधल्या बाबरी मशीद प्रकरणाचा प्रभाव यावर असण्याची शक्यता आहे.
१९५१ मध्ये पंतप्रधान नेहरू आणि काँग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तमदास टंडन यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरुंनी पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष ही पदे एकाच व्यक्तीकडे असू नयेत अशी भूमिका घेऊन पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. टंडन यांच्या अल्पसंख्यांक आणि अर्थव्यवस्थेच्या भूमिकांच्या विरोधात रफी अहमद किडवाई, मौलाना आझाद आणि आचार्य कृपलानी यांनी राजीनामा देऊन वेगळा पक्ष स्थापन केला. नंतर टंडन आणि नेहरू यांच्यातील मतभेद विकोपाला गेले आणि नेहरू काँग्रेस सोडणार अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेर नेहरूंची सरशी झाली आणि तेव्हापासून काँग्रेसमध्ये पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष हे शक्यतो एकच व्यक्ती असावेत किंवा निदान एकाच मताचे असावेत असा अलिखित नियम बनला. कथेमध्ये महेश कपूर आझाद आणि कृपलानी यांच्या पक्षात सामील होतात. अशा प्रकारच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये कथानक ऐतिहासिक घटनांवर आधारित पण काल्पनिक आहे अशा प्रकारची नोटिस असते. सुटेबल बॉयमध्ये अशी कोणतीही नोटिस दिलेली नाही. इथे एक रोचक विचार येतो. महेश कपूर यांचे पात्र तेव्हाच्या एखाद्या नेत्यावर आधारलेले असावे का? पूर्व प्रदेश आणि ब्रह्मपूर हे काल्पनिक करण्यामागचे कारण काय असावे?
विक्रम हाडाचा कवी आहे हे त्याच्या कविता वाचून कळतंच, मात्र गद्य लिहितानाही तो कवितेला विसरत नाही. सुटेबल बॉयमध्ये विक्रमने आभार मानताना एक कविताच केली आहे, शिवाय अनुक्रमणिकेमध्ये प्रत्येक प्रकरणाचा सारांश दोन-दोन पद्य ओळींमध्ये दिला आहे. पात्रांमधील अमित चॅटर्जी हा कवी आहे आणि त्याचे पात्र विक्रमने स्वत:वर बेतल्याचं जाणवतं. अमितने लिहिलेली 'द फीवर बर्ड' ही सुरेख कविता वाचताना त्यातला विक्रम सेठ स्वच्छ दिसतो. याखेरीज लिटररी सोसायटीच्या मिटिंगमध्ये कवींनी 'ट ला ट' जोडून केलेल्या कविताही वाचायला मिळतात. पैकी भारताच्या स्वातंत्र्यावर केलेली २९ कडव्यांची एक कविता महान आहे - "Mahatma came to us like summer 'aandhi', Sweeping the dungs and dirt, was M. K. Gandhi". (टुकार कविता लिहीणं विक्रमला अवघड गेलं असेल का सोपं? ) चटर्जी कुटुंबामध्ये रोज सगळे नाश्त्याच्या टेबलावर जमतात. इथे जस्टिससाहेब कार याला द्यायची की तिला यासारख्या मुलांच्या मागण्यांवर निर्णय देतात. (कुकू उर्फ काकोली इतक्या वेळा कार वापरते की 'The car has been kuku'd' असा नवीन वाक्प्रचार तयार झाला आहे. ) या कुटुंबात आणखी एक वेगळीच साथ आहे. 'खूबसूरत'मध्ये रेखा, तिची बहीण आणि डेव्हिड जसे प्रत्येक वाक्याला रदीफ आणि काफ़िया जुळवत असतात तसंच अमित, मीनाक्षी, काकोली आणि तपन येताजाता 'कपलेट्स' फेकत असतात. याची सुरूवात अमितने केली पण लवकरच काकोली यात इतकी प्रवीण झाली की अशा शीघ्रकाव्यांचं 'काकोली कपलेट्स' असं नामकरण करण्यात आलं. (Morning bathing in the Ganga, Guranteed to make you younger'. ) सुटेबल बॉयमधली बरीच पात्रं खऱ्या माणसांवर बेतली असल्याचं विक्रमनं सांगितलं आहे मात्र नावं अर्थातच बदलली आहेत, एक अपवाद सोडून. विक्रमने आपला कुत्रा कडल्सचं पात्र नावासकट कादंबरीत ठेवलं आहे ('बिकॉज ही कांट स्यू').
विक्रम कवी आहे याचे इतर पुरावेही त्याचं गद्य साहित्य वाचताना मिळतात. चॅटर्जी मुलांबद्दल बोलताना 'None of them worked, but each had an occupation' सारखी वाक्यं तो सहज लिहून जातो. याखेरीज बहुतेक प्रकरणांचा किंवा प्रकरणातील विभागांचा शेवटचं वाक्य स्तब्ध करायला लावणारं असतं. असं वाक्य वाचताना हायकूमध्ये जसं शेवटची ओळ अर्थ बदलून टाकते किंवा एक वेगळाच 'टच' देते तसं वाटतं. जणू काही एखाद्या चित्रकारानं चित्र पूर्ण केल्यानंतर एक शेवटचा फटकारा मारताना छोटासा बदल करावा आणि त्यामुळे चित्राला वेगळाच अर्थ मिळावा तसं काहीसं. तर काही वेळा एखाद्या वाक्यानं पाश्चात्य संगीतातील 'कोडा' आठवतो. (एक मूव्हमेंट संपली आहे हे दर्शविण्यासाठी त्या मूव्हमेंटच्या शेवटी एक निर्णायक सूर येतो - बहुतेक वेळा व्हायोलिन किंवा पियानोचा - तोच कोडा. )
सुटेबल बॉयचा टोन मुख्यत्वे 'सटायर' आहे असं वाटतं. दु:खद प्रसंग वगळता बाकीच्या प्रसंगांमध्ये निवेदक हळूच एक एक विसंगती, कधी गंभीरपणे तर कधी नर्मविनोदी शैलीत आपल्यासमोर आणत असतो. मशीदीच्या शेजारीच शिवमंदिर बांधायचं नक्की झाल्यावर उस्ताद माजिद खान रियाज करता करता व्यथित होतात. मंदिर मशीदीच्या पश्चिमेला - म्हणजे रोज नमाज पढताना आपण या काफिरांच्या देवासमोर झुकणार. काय म्हणावं याला? पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की जो भैरव राग ते गात होते त्याचं नाव शिवाचंच एक नाव आहे. किंवा पंडित नेहरू निवडणुकांच्या आधी सलिमपुरमध्ये भाषण करताना कधी ब्रह्मपूरपर्यंतही न गेलेल्या खेडुतांसमोर कोरियन क्रायसिस किंवा इजिप्तच्या प्रश्नांबद्दल बोलतात. बेन्स्टन ऍंड प्राइस या ब्रिटिश कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेल्या अरूणला एकदाही इंग्लंडला न जाताही लंडनची इत्थंभूत माहिती असते. आपल्या निवडणुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना तो आणि त्याचे सहकारी चर्चिल परत निवडून येईल किंवा नाही यावर समरसून चर्चा करत असतात.
सुटेबल बॉय एक वास्तववादी कादंबरी आहे. निवेदक सर्वज्ञ आहे, सर्व पात्रांच्या मनात काय चाललं आहे हे त्याला कळतं. एका ठिकाणी मात्र जरा आश्चर्यचकित करणारं वाक्य आहे. महेश कपूर आणि नवाबसाहेब गाडीतून जात असतात. दोघेही शांत असतात. इथे निवेदक म्हणतो, "ते काही बोलले नाहीत हे दुर्दैव. ते बोलले असते तर काय त्यांनी काय म्हटलं असतं हे बघणं रोचक ठरलं असतं." एरवी सगळ्यांच्या मनात बेधडक प्रवेश करणाऱ्या निवेदकाला ही दारं का बंद झाली? तसंच दुसऱ्या एका ठिकाणी मान कपूर आणि त्याचा उर्दू शिक्षक रशीद तळ्याकाठी बसलेले असतात. मान विचारतो, "ते कोणतं झाड आहे?" रशीद म्हणतो, "सदाबहार - ऑर एव्हरग्रीन." ग़ालिब आणि मिरच्या गझला पाठ असणाऱ्या मानला सदाबहारचा अर्थ माहीत नसावा हे शक्य नाही. तसंच भारतीय वाचकांनाही हे माहीत असणार. इथे निवेदक आंग्ल वाचकांची सोय बघतो आहे हे स्पष्ट होतं. पण अशा किरकोळ बाबींमुळे फारसा फरक पडत नाही. विक्रम सेठला या कादंबरीमुळे साहित्यिक क्षेत्राच्या जाणिवा विस्तारतील किंवा नाही याची काळजी नसून चांगली गोष्ट कशी सांगावी याची आहे
१.
बहुतेक प्रथितयश लेखकांची एक विशिष्ट शैली असते. हेमिंग्वे कमीत कमी शब्द आणि छोट्या वाक्यांसाठी प्रसिद्ध आहे, डिकन्स विस्तृत वर्णनांसाठी. विक्रम इतक्या साध्या आणि सोप्या शब्दात सगळं सांगतो की शैली वगैरे शोधायचा विचारच मनात येत नाही. पूर्ण पुस्तक वाचताना फक्त एकदाच एक शब्द आवर्जून शब्दकोशात बघावासा वाटला. (फारच सुरेख शब्द - Acrostic - जिच्या प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर जुळवलं तर गुप्त संदेश मिळतो अशी कविता. ) साध्या शब्दांतून हे अनोखं विश्व उभारणं विक्रमला कसं जमलं? कादंबरीची आणखी एक खासियत म्हणजे तपशील. ब्रह्मपूरमधील चांभार उद्योग - बूट, चपला बनवण्याच्या प्रक्रियेपासून ते आपल्या घटनेचं १४ वं कलम आणि अमेरिकेची १४ वी अमेंडमेंट यांच्यातील साम्य अशा अनेक विषयांचं खोलात जाऊन वर्णन केलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातलं सामान्य जीवन कसं होतं याचं सुरेख चित्र या कादंबरीत बघायला मिळतं. खुशवंत सिंग यांनी हा काळ अनुभवला आहे. त्यांना या कथेत शोधूनही एकही तपशिलाची चूक आढळली नाही. गंमत म्हणजे विक्रम सेठचा जन्म कादंबरीतील काळ संपल्यानंतर १९५२ साली झाला.
इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो. १९५१ हे साल निवडण्याचं कारण काय? ज्या चार मुख्य कुटुंबांची ही कथा आहे ती कुटुंबं सुखवस्तू आहेत. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांनाही फाळणीचे चटके बसले होते. कपूर कुटुंबाला लाहोरमधून इकडे प्राण मुठीत धरून यावं लागलं, त्याचे संदर्भ येत असतात. येताना हल्ला झाला त्याचे व्रण अजूनही प्राण कपूरच्या हातावर आहेत. कादंबरी चार वर्ष आधी - १९५१ ऐवजी १९४७ मध्ये बेतली असती तर कितीतरी मोठं नाट्य रंगवायला मिळालं असतं. मग विक्रमनं असं का केलं असावं? १९५१ मध्ये पात्रांच्या समोर अडचणी आहेत पण त्या जीवनमरणाच्या नाहीत, "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" या स्वरूपाच्या आहेत. मिसेस रूपा मेहरांच्या समोर असलेले प्रश्न - लताचं लग्न कधी होईल, वरूणच्या नोकरीचं काय - अवघड आहेत, अशक्य नाहीत.
टॉलस्टॉयची प्रसिद्ध शोकांतिका - ऍना कॅरॅनिनाचं पहिलंच वाक्य आहे, "Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way." साहित्यामध्ये आनंदी कथांपेक्षा दु:खी कथांना झुकतं माप मिळाण्याची परंपरा ग्रीक शोकांतिकांपासून चालू आहे. विक्रमने सुटेबल बॉयमध्ये या प्रवाहाच्या विरूद्ध गेलं तर काय होतं हे शोधलं आहे. दुष्काळ, महामारी, देशोधडी यासारख्या आपत्तींना सामोरे जाणाऱ्या लोकांपेक्षा रोजच्या आयुष्यातल्या छोट्या-छोट्या संघर्षांना तोंड देणारे लोक त्याला अधिक रोचक वाटतात. सुटेबल बॉय वाचल्यानंतर इतके दिवस निमूटपणे स्वीकारलेल्या टॉलस्टॉयच्या वाक्याबद्दल प्रश्न उभे राहिले. कोणतंही कुटुंब शंभर टक्के सुखी असू शकतं का? आणि रंजलेल्या-गांजलेल्या, भकास-उदास कुटुंबांमध्येच साहित्यिक मूल्याच्या कथा असतात का? साहित्य हे आयुष्याचं प्रतिबिंब मानलं तर सुखी आयुष्यांमध्येही मानवी स्वभावाचे पैलू दिसायला काय हरकत आहे?
२ आवडणारी पुस्तकं बरीच असतात, ती आवडण्याची कारणंही वेगवेगळी असतात. फार क्वचित एखादं पुस्तक भारून जायला होतं. यापूर्वी असा अनुभव मुराकामीच्या बाबतीत आला आहे. पण मुराकामी वाचून येणारी अनुभूती आणि विक्रम सेठ वाचून येणारी अनुभूती यांच्या जातकुळीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. मुराकामीचं जग जादुई असतं, स्वप्न आणि सत्य यांच्या सीमारेषेवरचं. विक्रम सेठचं जग जे आपल्याला आजूबाजूला दिसतं तेच आहे. आपल्याला कुठेतरी रूपा मेहरा किंवा अमित चॅटर्जी भेटलेले असतात. मग त्यांच्या या साध्याश्या वाटणाऱ्या कथेनं संमोहित का करावं? कदाचित जेम्स वुड सुटेबल बॉयबद्दल म्हणतो तसं असावं, "Such writing reminds us that there are secrets beyond technique, beyond even style, which have to do with a quality of soul on the part of the writer."
----
चित्र विकीवरून साभार.
----
१. मुराकामीसारखे काही अपवाद सोडले तर आधुनिक साहित्यापेक्षा मला वास्तववादी साहित्य अधिक भावतं. आधुनिक साहित्यामध्ये जे वेगवेगळे प्रयोग होतात ते स्वागतार्ह आहेत यात शंका नाही. मात्र यामुळे त्याआधी आलेला वास्तववाद (Realism) बाद होतो हे पटत नाही. आधुनिकतावादाची (Modernism) रेघ मोठी करण्यासाठी वास्तववादाची रेघ पुसण्याचे कारण का पडावे हे आकलनाबाहेरचे आहे. म्हणूनच विल सेल्फसारखा नावाजलेला लेखक "मी आणि माझे काही आवडते लेखक हेच सर्वश्रेष्ठ, बाकी सगळे टुकार. आधुनिकतावाद हेच अंतिम सत्य, बाकी सगळं भिकार." असं
म्हणतो तेव्हा त्याला 'सेल्फ ऑब्सेस्ड रॅंट' या पलीकडे फारसं महत्त्व द्यावंस वाटत नाही. आधुनिक साहित्य वाचताना येणारी एक मोठी अडचण म्हणजे यातले हंस कोण आणि बगळे कोण हे ओळखणं अवघड असतं. पारंपरिक साहित्यामध्ये यशस्वी होण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या गुणवत्तेची गरज असते. लोकांच्या वेगवेगळ्या रूची आणि त्यामुळे येणारा सापेक्षपणा बाजूला ठेवला तर पारंपरिक साहित्यामध्ये प्रभावीपणे कथा सांगू शकणारे साहित्यिक यशस्वी होतात असं दिसतं. आधुनिक साहित्यामध्ये बरेचदा लेखक किती हुशारीने शब्दखेळ करू शकतो, पारंपरिक नियम मोडू शकतो, वाचकांना कोड्यात टाकू शकतो यावरच सगळा भर असतो. याचं टोकाचं उदाहरण म्हणजे जेम्स जॉइसची 'फिनेगन्स वेक' ही एक सर्वश्रेष्ठ कादंबरी आहे की जॉइसचा 'अल्टिमेट प्रॅंक' आहे याबद्दल अजूनही समीक्षकांमध्ये चर्चा होते आहे.
२. इतकं लिहिलं म्हणजे याचा अर्थ 'कादंबरी वाचाच' असा नव्हे. हा इशारा देण्याचं कारण बरंच वजनदार आहे. जगातील सर्वात मोठ्या कादंबऱ्यांमध्ये सुटेबल बॉयचा समावेश होतो. दीडदोनशे पानांचं पुस्तक किंवा दोन-एक तासांचा चित्रपट 'खुशाल वाचा किंवा बघा' म्हणायला काही वाटत नाही. सव्वा किलो वजनाची, १४७४ पानं वाचा असं म्हणायला जीभ अडखळते. रोज पन्नास पानं वाचलीत तर एक महिना लागेल, रोज दहा वाचलीत तर पाच महिने. इतका वेळ द्यायचा किंवा नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं. म्हणूनच आभार मानताना विक्रम वाचकांना उद्देशून म्हणतो, "Buy me before good sense insists, You'll strain your purse and sprain your wrists."
आणखी एक. ज्यांना साहित्यामधून फक्त भकास, उदास, विषण्ण, अतीव दु:खाच्या वेगवेगळ्या छटा अपेक्षित असतात त्यांनीही या वाटेला न गेलेलं बरं. जर वाचायला घेतलंत आणि शंभर पानांपर्यंत आवडणार नाही असं लक्षात आलं तर खुशाल सोडून द्या. न आवडणारी पुस्तकं बाजी प्रभूनं खिंड लढवली होती त्या निष्ठेनं शेवटपर्यंत वाचत राहणे - आत्मपीडनासाठी याहून चांगला मार्ग नाही.