मराठी वाचकांना रवींद्र गुर्जर यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. आज कोणत्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये अनुवादांचा वेगळा विभाग निघावा इतके मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. पण ज्या काळात वर्षात एखादा मराठी अनुवाद मुश्किलीने बाजारात येत असे, त्या काळात गुर्जर यांनी पॅपिलॉन, गॉडफादर, कोमा, सुवर्णयोगी यासारख्या उत्तमोत्तम कलाकृती मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचं बहुमोल काम केलं आहे. या अनुवादांचे एक वैशिष्ट्य म्हणजे वाचताना कुठेही आपण अनुवाद वाचत आहोत असं वाटत नाही. या पुस्तकांचे कथानक, संस्कृती परकी असली तरी एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे पुस्तकाचा निवेदक मात्र आपल्या मायबोलीतूनच आपल्याशी संवाद साधत असतो. या अनुवादांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळण्यामागे हे कारण नक्कीच आहे. याच सहज शैलीमध्ये गुर्जर यांनी नुकतंच अल्बर्ट आइन्स्टाईनचं जीवनचरित्र अनुवादित केलं आहे. ऍलिस कॅलाप्राइस आणि ट्रेव्हर लिप्सकोम्ब यांनी लिहिलेलं हे जीवनचरित्र
जयको पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केलं आहे.

बरेचदा जीवनचरित्र - ते ही आइन्स्टाईनसारख्या जगविख्यात व्यक्तीचं असेल तर त्यात त्या व्यक्तिमत्वाचे सगळे कंगोरे न येता त्याची फक्त चांगली बाजू समोर येण्याचा धोका असतो. कॅलाप्राइस आणि लिप्सकोम्ब यांनी हे जाणीवपूर्वक टाळलं असल्याचं जाणवतं. पुस्तक वाचताना आइन्स्टाईनचे चांगले गुण, त्याची अतुलनिय कामगिरी हे वाचकांसमोर येतंच, पण त्याचबरोबर नेहेमी आइन्स्टाईनबद्दल वाचताना उघड न होणारे असे त्याच्या स्वभावातील काहीशा अप्रिय पैलूंचाही परिचय होतो. यामुळे आइन्स्टाईनचे व्यक्तिमत्व एक असामान्य बुद्धीमत्तेचा गणिती इतपत मर्यादित न राहता गुण-दोष असलेला एक माणूस म्हणून त्याचा आपल्याला परिचय होतो. आइन्स्टाईनसारख्या चतुरस्त्र व्यक्तीमत्वाचा जीवनपट दोनशे पानात मांडणं सोपं काम नाही. पुस्तकातील बारा प्रकरणांपैकी तीन प्रकरणांमध्ये आइन्स्टाईनच्या पदार्थविज्ञानातील संशोधनाचे स्पष्टीकरण आहे. बाकीची नऊ प्रकरणे त्याच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना, त्यामुळे त्याच्या विचारांमध्ये झालेला बदल, त्याचा मानवतावाद अशा अनेक पैलूंचा परिचय करून देतात. आइन्स्टाईनच्या स्वभावाची जडणघडण आणि वैयक्तिक आयुष्यातील चढउतार यांच्या नोंदींवरून या महान शास्त्रज्ञाच्या आत दडलेल्या माणसाची ओळख होत जाते. अल्बर्ट लहानपणी चांगला विद्यार्थी नव्हता असा लोकप्रिय समज आहे. पण तो खरा नसल्याचा निर्वाळा पुस्तकाच्या सुरूवातीलाच मिळतो. लहानपणीच भेट मिळालेलं होकायंत्र पाहून लहान अल्बर्ट निसर्गातील न दिसणाऱ्या शक्तींबद्दल त्याला जबरदस्त कुतूहल निर्माण झालं.
आइन्स्टाईनविषयी फारशा प्रसिद्ध नसलेल्या अनेक गोष्टी पुस्तक वाचल्यानंतर समोर येतात. उदा. आइन्स्टाईनची प्रतिभा केवळ फक्त क्लिष्ट गणिते आणि सिद्धांत यापुरतीच मर्यादित नव्हती. फावल्या वेळामध्ये त्याला हाताने प्रयोग करून बघायला आवडत असे. एका लोखंडी सिलिंडरभोवती तार गुंडाळून तिच्यातून बदलणारा विद्युतप्रवाह सोडला तर सिलींडरला प्राप्त होणाऱ्या बदलत्या चुंबकत्वामुळे तो स्वत:भोवती फिरू लागतो. आइन्स्टाईनने द हास या आपल्या सहकाऱ्याबरोबर यावर प्रयोग करून याचे सैद्धांतिक स्पष्टीकरण दिले. हा सिद्धांत 'आइन्स्टाईन-द हास इफेक्ट' या नावाने ओळखला जातो. स्विस पेटंट कार्यालयात काम करताना आइन्स्टाईनला पेटंट मिळवण्याच्या कार्यपद्धतीबद्दल चांगलीच माहिती झाली होती. याचा उपयोग करून त्याने सात पेटंट मिळवलीही. यातलं एक घरगुती रेफ्रिजरेटरच्या एका भागासाठी होतं. लिओ जिलार्डबरोबर त्याने तयार केलेल्या या उपकरणाला 'आइन्स्टाईन-जिलार्ड' पंप असं नावही मिळालं. याखेरीज गायरोकंपास (फिरतं होकायंत्र), प्रकाशाची तीव्रता आपोआप जुळवून घेणारा कॅमेरा अशी पेटंटही त्याच्या नावावर आहेत. नद्या रूंद मुखाशी पोचेपर्यंत कशी वळणे घेतात यावरही त्याने एक निबंध प्रकाशित केला. आयुष्यभर आइन्स्टाईन 'क्वांटम मेकॅनिक्स' - पुंजभौतिकी - या शाखेबद्दल संतुष्ट नव्हता. निसर्गाच्या नियमांमधून निमित्तकारणाचा त्याग करावा लागेल ही कल्पना त्याला पटत नव्हती. 'ईश्वर फासे खेळत नाही' हे त्याचे या संदर्भातील वचन प्रसिद्ध आहे. मात्र याला निल्स बोरने दिलेले उत्तर रोचक आहे. बोर म्हणाला, 'ईश्वराला काय करायचं हे सांगणं थांबव.'
पहिल्या महायुद्धादरम्यानच आइन्स्टाईनचा शांततावादाच्या दिशेने ओढा असल्याचं दिसतं. दुसरं महायुद्ध सुरू होण्याआधी आइन्स्टाईनला जर्मनीमध्ये प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. स्टार्क आणि लेनार्डसारख्या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनीही सापेक्षतावादाला 'ज्यूंचे शास्त्र' म्हणत त्याची हेटाळणी केली. नंतर जर्मनीमधील परिस्थिती सहन करण्याच्या पलिकडे गेल्यावर त्याने जर्मनीचे नागरिकत्व सोडले. अमेरिकेत आल्यावर राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांना 'जर्मनीने बॉंब बनवण्याआधी अमेरिकेने बनवायला हवा' अशा आशयाच्या पत्रावर त्याने सही केली पण नंतर याचा त्याला आयुष्यभर पश्चाताप झाला. अमेरिकेत असतानाही एफबीआयच्या संशयित यादीत असल्यामुळे सुप्रसिद्ध 'मॅनहॅटन प्रोजेक्ट'वर काम करण्याची संधी त्याला मिळाली नाही. अमेरिकेत असताना जर्मनीहून आलेल्या निर्वासितांना मदत करण्यामध्ये त्याने कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.
आइन्स्टाईनसारखी क्रांतिकारी विचार मांडून घडवणारी व्यक्ती कित्येक युगांमध्ये एकदा जन्माला येते. आपल्या भोवतालचे जग कसे आहे, स्थल-काल यांचे नेमके स्वरूप काय आहे याबद्दल पूर्वापार चालत आलेल्या कल्पना आइन्स्टाईनने मुळापासून बदलून टाकल्या. विशेष म्हणजे त्याने केलेलं काम इतकं मूलभूत होतं की सापेक्षता सिद्धांत मांडला नसता तरीही त्याची सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञांमध्ये गणती झाली असती. याखेरीज सामान्य जनतेमध्ये आइन्स्टाईन ओळखला जातो तो त्याची नम्रता, त्याचे मूल्याधिष्ठीत विचार आणि जागतिक शांततेसाठी त्याने केलेल्या अथक प्रयत्नांसाठी.
इंग्रजीमध्ये आइन्स्टाईनवर इतके ग्रंथ उपलब्ध आहेत की त्यांची यादी केली तर त्याचेच एक छोटेसे पुस्तक होऊ शकेल. मराठीत मात्र अशी माहितीपूर्ण पुस्तके फारशी नाहीत. क्लिष्ट प्रतिशब्द टाळून सोप्या आणि ओघवत्या भाषेत अनुवादित केलेले हे चरित्र या दृष्टीने महत्वाचे आहे. सुबक आणि आकर्षक बांधणीबरोबरच आइन्स्टाईनच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग दर्शवणारी दुर्मिळ छायाचित्रे हे याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. विज्ञानप्रेमींबरोबरच आइन्स्टाईनबद्दल उत्सुकता असणाऱ्या वाचकांसाठीही हे चरित्र वाचनीय ठरावे.
अल्बर्ट आइन्स्टाईन
लेखक - ऍलिस कॅलाप्राइस आणि ट्रेव्हर लिप्सकोम्ब
अनुवाद - रवींद्र गुर्जर
प्रकाशक - जयको प्रकाशन
पृष्ठसंख्या - २०५
किंमत - रू. १९५/-
----
चित्र विकीवरून साभार.