 |
| सिंधू घाट |
आज सर्वात प्रथम आम्ही सिंधु नदीच्या घाटावर जाणार होतो. लेह शहर मागे पडलं तसं हमरस्त्याच्या दुतर्फा छोट्या छोट्या डोंगरांच्या राशी ओतून ठेवाव्यात तसं दिसत होतं. वाटेतच बौद्ध धर्माचे गुरू दलाई लामांचं निवासस्थान लागलं. मध्येच प्रेयींग व्हील्स दिसत होती. थोड्याच वेळात आम्ही सिंधू नदी जवळ पोहोचलो. सिंधू नदिचा बहूतांश भाग फाळणीनंतर आता पाकिस्तानात असला तरी सुमारे तीनशे किलोमीटर एवढा नदीचा भाग हा आजही भारताच्या जाम्मू-काश्मीर राज्यातून वाहत जावून पुढे तो पाकिस्तानात जातो हे फार थोड्यानाच माहीत असेल. जिच्या केवळ नामोच्चाराने कोट्यावधी भारतीयांच्या मनात पवित्र भाव निर्माण होतात. हिंदू संस्कृती जिच्या काठी रुजली, फोफावली ती वेदांची जननी म्हणजे सिंधू. तीच्या काठावर उभा असताना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठतो. सिंधूवरून हिंदू आणि म्हणून हिंदूस्थान, तसच इंडस वरून इंडीया अशी आपल्या देशाला नावं पडली. तिबेटमध्ये मानसरोवरनजीकसिन-का-बाव इथे उगम पावून पुढे सिंधू नदी आपल्या भारतात लडाख प्रांतात प्रवेश करते. ऋग्वेदापासून महत्वाच स्थान असलेल्या या नदीच्या काठी कधी काळी आर्यानी वस्ती केली होती. तिच्या काठी आम्ही उभे होतो. खळाळणारं स्वछ, शीतल जल घेवून वहात जाणार्या या नदीला पुढे झंस्कार व्हाली मधून वाहत येणारी झंस्कार नदी मिळते आणि नंतर पाकिस्तानात जाते. लडाखमध्ये जी शेती होते ती बहुतांश या नदीच्या पाण्यावर. इतर ठिकाणी गवताची पातीही दिसणार नाही पण या नदीच्याकाठी मात्र हिरवळ दिसते. दरवर्षी जून महीन्यात सिंधू घाटावर सिंधूमहोत्सव साजरा केला जातो. या घाटावरून लडाखच्या सर्वात उंच अशा स्तोक कांगरी शिखराच सुरेख दर्शन होतं.