आता विनोदाला गंभीरपणे घ्यायची वेळ आली आहे. हे वाक्य विनोदी नाही, गंभीरच आहे. आजूबाजूला दिसणार्या विनोदाचा दर्जा पाहीला तर हे होत नाहीये असं प्रकर्षानं जाणवतं. कदाचित यामागे 'विनोद म्हणजे काय कुणालाही जमू शकतो. त्यात काय एवढं?' अशी भावनाही असू शकेल. प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे. विनोदी लेखन - ज्याच्यावर वाचकांची हहपुवा होते - लिहीणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि सोपीही आहे. कधीकधी इतका सहज जमून जातो की काय झालं ते आपलं आपल्यालाही कळत नाही. पण आता विनोदी लेख पाडायचा लिहायचा असं ठरवून लिहू म्हटलं तर दस्तोयेव्हस्कीच्या नायकाइतकी विनोदबुद्धीही आपल्याकडे आहे किंवा नाही अशी शंका येते. पुलंवर विविध प्रकारे टीका झाली, होत आहे. त्यांचा विनोद बर्याच अंशी कालबाह्य झाला आहे हे खरं. पण कोणताही विनोद सदाबहार राहूच शकत नाही कारण पहिल्यांदा ऐकल्यावर त्यात जो 'सरप्राइझ एलेमेंट' असतो तो नंतर राहत नाही. म्हणून पुलंच काय, कोणताही विनोदी लेखक परत परत वाचला तर तितका विनोदी राहत नाही. पण आजही पुलंच्या विनोदाची जातकुळी अस्सल आहे हे सहज कळते. हाताची दोन बोटे भरतील इतकेही विनोदी लेखक मराठीत नसताना या दर्जाचा विनोद निर्माण करणे उल्लेखनीय आहे.
आजचं बहुतेक तथाकथित विनोदी लिखाण पाहीलं तर बरेच प्रश्न पडतात. खरं तर इतर कोणत्याही लिखाणापेक्षा विनोदी लिखाण कसं झालं आहे हे पटकन कळतं. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं तुम्हालाच हसू आवरत नाही. दुसरं - लोकंही उस्फूर्तपणे दाद देतात. परीक्षा बघायची असेल तर आत्ताच्या आत्ता एक विनोद तयार करा आणि समोरच्याला सांगा. अट एकच - समोरचा खळखळून हसला पाहीजे. तुमचा मित्र आहे म्हणून सहानूभूतीपूर्वक LOL
१ म्हटलेले चालणार नाही. अर्थात इथे एक गोम आहे. प्रत्येक मित्रमंडळामध्ये हमखास 'आतले विनोद' असतात. बाहेरच्याला यातलं काही कळत नाही आणि कळलं तरी बरेचदा विनोदी वाटत नाही. अशा प्रकारचा विनोद वेगळा असतो. मित्रमंडळ जमलं असेल तर हा करायला खूप सोपा पण याचं त्या स्वरूप वर्तुळापुरतच मर्यादित असतं. अर्थात कुशल लेखक असेल तर तो हा 'आतला विनोद' असा खुलवतो की त्याचं स्वरूप व्यापक होऊन जातं पण 'हे येरागबाळ्याचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे.'
कधीकधी एखादा प्रसंग इतका विनोदी होऊन जातो की बस! पण नंतर आठवलं तर वाटतं की आपण इतकं कशाला हसत होतो? एकदा मी बाला नावाच्या एका मित्राबरोबर इंदोरला गेलो होतो. आयूसी - इंटर युनिव्हर्सिटी सेंटरमध्ये - एक वर्कशॉप होतं. वर्कशॉप करून पुण्यासाठी रात्रीची गाडी पकडली. गाडीत आमच्या सीटच्या दोन-तीन सीट पुढे एक माणूस घोरायला लागला. त्याचं घोरणं इतकं कर्कश्श होतं की बसचा आवाजही त्यापुढे सौम्य वाटत होता. झोप येणं शक्यच नव्हतं, मग मी आणि बाला सुरू झालो. त्याच्या घरचे कसे झोपत असतील पासून ते जन्मल्यावर तो रडण्याऐवजी घोरत असेल का वगैरे काहीही. पुढचे दोन-तीन तास आम्ही इतके विनोद केले की शेवटी पोट दुखायला लागलं.
विनोदबुद्धी ही उत्क्रांतीमधून मिळालेली ती एक अमूल्य भेट आहे. पण आज बहुतेक ठिकाणी ती ज्या प्रकारे वापरली जाते आहे ते बघून आपली उत्क्रांती आता उलट दिशेने होते आहे की काय अशी शंका येते. चित्रपट, साहित्य, मालिका - खदखदून हसायला लावील असा विनोद आज किती ठिकाणी बघायला मिळतो? या बाबतीतही पाश्चात्य देश आपल्या पुढेच आहेत असं दिसतं. सिटकॉमसारखा प्रकार आजही आपल्याकडे दिसत नाही. कारण उघड आहे. यशस्वी सिटकॉम लिहीण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. 'पैका कमवणे' हे एकमेव ध्येय असलं तर काय अपेक्षा ठेवायची? विनोदामध्येही 'डार्क ह्युमर' पासून ते 'सटायर' पर्यंत विविध प्रकार असतात हे आपल्याला ठावूकच नाही असं कधीकधी वाटतं. आपण फक्त विनोद अश्लील आहे का नाही अशी सनातनी विभागणी करतो
२. सटायर आणि सारकॅझ्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सारकॅझ्म म्हणजे खाटकाची सुरी आहे. कशीही आडवितिडवी चालवायची. याउलट सटायर म्हणजे एखाद्या निष्णात सर्जनने केलेली शस्त्रक्रिया आहे. इथे विसंगती इतक्या हळूवारपणे समोर येते की खुद्द पेशंटही खुदकन हसतो. सटायर माणसाला अंतर्मुख करतं, सारकॅझ्म सरळ कत्तल करतं
३.
अशी ही विनोदबुद्धी. हिचं रहस्य काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न भल्याभल्यांनी केला. फ्रॉइडने यावर पुस्तकही लिहीलं. सुप्रसिद्ध 'फ्रॉइडियन स्लिप' चा जन्म इथेच झाला. तर लेखक उंबेर्तो एको यांच्या मते सजीव प्राण्यांमध्ये माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याला आपलं आयुष्य मर्यादित आहे ही जाणीव आहे. या जाणीवेपासून सुटका म्हणा किंवा वेगळी प्रतिक्रिया म्हणा, विनोदबुद्धीचा जन्म झाला असा त्यांचा सिद्धांत आहे. कारण विनोदबुद्धीही फक्त माणसामध्येच सापडते. मृत्यू आणि विनोदबुद्धी यांचा नक्की संबंध काय ते अजूनही त्यांना स्पष्ट झालेलं नाही. खरं तर एको यांना या सिद्धांतावर पुस्तक लिहायचं होतं, पण त्यांनी लिहीलं '
द नेम ऑफ द रोझ.'
विनोदाची एक खासियत म्हणजे याचं सोंग घेता येत नाही. तुम्ही एखादा गंभीर लेख लिहीला आणि लोकांना आवडला नाही तर तुम्ही खुशाल त्यांना माझी योग्यता कळलीच नाही असा बचाव करू शकता. विनोदी लेखाच्या बाबतीत मात्र तो विनोदी असतो किंवा नसतो, मधलं काही नाही. आणि विनोदी नसला तर तो फारच केविलवाणा होतो. रॉबिन विलियम्सच्या शब्दात सांगायचं झालं तर 'इट सक्स डेड एअर. इट्स अ व्हॉइड.' अस्सल जातिवंत विनोद म्हणजे काय याची एक झलक रॉबिन विलियम्सच्या या मुलाखतीत बघायला मिळते. हे सगळं उस्फूर्त आहे हे कळल्यावर तर याला 'जिनियस' म्हणण्यावाचून पर्यायच उरत नाही. (एक इशारा - काही खाता-पिताना बघू नका.)
--------
१. आंतरजालामुळे LOL शब्दाला काही अर्थच उरलेला नाही. हा शब्द कुठेही, कसाही इतक्या निष्काळजीपणे वापरला जातो आहे की त्याचा नेमका अर्थ काय हे कळणेच अवघड झाले आहे. १०० पैकी ९९ वेळा LOL म्हणताना हहपुवा सोडाच, साधं हसूही येत नाही इतके केविलवाणे विनोद असतात.
२. दादांचे सुरूवातीचे विनोद अस्सल होते, नंतर त्यांचा दर्जा कमी होत गेला. अर्थात त्यांच्या विनोदाला अश्लील म्हणणार्या समाजामध्ये अमेरिकन सिटकॉममधले सगळे विनोद चालतात हा विरोधाभास रोचक आहे. त्यांच्या एका चित्रपटात दादांची गाठ मुलं पळवणार्या एका टोळीशी पडते. दादा त्यांना म्हणतात, 'दुसर्याची मुलं पळवायला लाज नाही वाटत? स्वत: कष्ट करायला नकोत.'
३. सटायर किंवा सारकॅझ्म दोन्हींसाठी मराठी शब्दांची वानवा आहे. सटायरमध्ये जो नाजुकपणा अपेक्षित आहे तो उपरोध, खिल्ली, उपहास यामध्ये येतो असे वाटत नाही. बरं, सटायर म्हणजेही उपरोध आणि सारकॅझ्म म्हणजेही उपरोध? ये बात कुछ जमी नही. तीच गोष्ट सिनिकलची. सिनिकलमध्ये ज्या २५६ छटा येतात, त्यातली एकही शंकेखोरमध्ये येत नाही. शंकेखोर म्हणजे फार फार तर डाउटफुल. महाराष्ट्रात सिनिकल लोकांची थोर परंपरा असूनही याला योग्य शब्द असू नये याला काय म्हणावे? भ्रमणध्वनी आणि न्याहाळक यांचे निर्माते इकडे लक्ष देतील काय? ('अस्मिता sss, ए अस्मिता! काय करावं ह्या पोरीला? दिवसभर नुसती झोपा काढत असते. उठ आता, दोन लिटर कॉफी केलीये ती पिऊन टाक बरं गटागटा.')